पुणेकरांसाठी मोठी बातमी!
मेट्रोचे जाळे आता २०० किमीवर; मुख्यमंत्री फडणवीसांची ‘या’ नव्या मार्गांची घोषणा

मनीष अग्रवाल, पुणे
मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्या मेट्रोचे एकूण जाळे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रात २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुणे मेट्रोचे मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झासे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सध्या दररोज अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करावे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी यावेळी स्मरण केले. स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड आणि हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे.
भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. एकत्र डीपीआर करा सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत. तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढत्या उपनगरांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महामेट्रोला दिल्या. पुढील काळात जमीन, आकाश, भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे वाहतूक कोंडीरहित शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले




