मोजतबा खामेनेई साठी दुआ कर म्हणत सैलानीत केली मारहाण

प्रतिनिधी | बुलडाणा,
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे दुसरे पुत्र व कट्टरपंथी विचारसरणीचे मोजतबा खामेनेई हे जखमी असून त्यांच्या साठी दुआ कर म्हणत तिघांनी एकास मारहाण केली. या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नुकतेच उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार अंतराष्ट्रीयस्तरवरील इराण, इस्त्राईल व अमेरिका युध्दात इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गुप्त ठिकाणी उपचार सुरु आहे, अशा जागतिकस्तरावर बातम्या आहे. या बातम्याच्या अनुशंगाने तालुक्यातील सैलानी येथील पिंपळगाव सराई येथील रहिवासी असलम खान अब्दार खान पठाण वय ४४, रा. पिंपळगाव सराई हे घरासमोरील बोरचे बटण बंद करण्यासाठी गेले असता काही लोक जमा झाल्याचे दिसून आले. सदर घटना पाहण्यासाठी असलम खान घटनास्थळी गेला असता, या ठिकाणी आरोपी जावेद शहा अयुब शहा हा मदरशाच्या मौलानाला अब्दुल रहिम याला नमाजात मोजतबा खामेनेई याच्या आयुष्यासाठी दुआ कर अन्यथा खोली खाली कर अशी धमकी देत होता. यावर असलम खान याने जावेद शहा याला तो दुसऱ्या देशाचा आहे, आपल्याला काय करावयाचे आहे, असे सांगितले असता रागात येवून जावेद शहाने दगडाने मारहाण केली, ज्यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली व रक्तस्राव झाला. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावालाही अयुब शहा गुलाब शहा व नियाज अली शहा नूर अली शहा यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पत्नी व मुलीशीही गैरवर्तन करून त्यांना धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या गोंधळात फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तुटल्याचेही सांगण्यात आले आहे. जखमीला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले असून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी असलम खान अब्दार खान पठाण यांच्या तक्रारीवरुन रायपूर पोलीसात आरोपी अयुब शहा गुलाब शहा, नियाजअली शहानूरअली शहा व जावेद शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.




