नागपूर ते मुंबई समृध्दी मार्गावर सुरु होणार २२ सीएनजी स्टेशन
मे महिन्यात पहिले स्टेशन होणार प्रारंभ

प्रतिनिधी | नागपूर
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावर अदानी टोटल गॅसचे समृद्धीवरील पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन मे महिन्यापासून कार्यान्वित होत आहे. मुंबईकडे जाताना अमरावती जिल्ह्यातील शिवणीजवळील ‘एचपीसीएल’ पंपावर ही सुविधा वाहनचालकांना मिळणार आहे.
तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावर दररोज लाखो वाहनांची ये-जा सुरू आहे. या वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर पेट्रोल, डिझेलची सुविधा उपलब्ध आहे. मात्र मुंबई ते नागपूर या ७३८ किलोमीटरमध्ये एकही सीएनजी फिलिंग स्टेशन नाही. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे. तो पर्यावरणपूरकही असल्याने सीएनजीची मोठी मागणी आहे.
या स्टेशनवर वाहनांना २४ तास सीएनजी पुरवठा केला जाईल. या ठिकाणी चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी येथील मदर स्टेशनवरून सीएनजीचा पुरवठा करण्यात येणार आहे. बोरी ते एचपीसीएल फिलिंग स्टेशन हे अंतर कमी आहे. अमरावती व परिसरात सीएनजीचा सध्या दर सरासरी ९४ रुपये प्रतिकिलो आहे.
२२ स्टेशन्स कार्यान्वित
सध्या अमरावती, वाशिम, अकोला, हिंगोली आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये समृद्धी महामार्ग वगळता जिल्ह्यातील अंतर्गत व अन्य मार्गांवर सध्या सीएनजीचे २२ फिलिंग स्टेशन्स सुरू झाले आहेत. यामध्ये अमरावती ८, यवतमाळ ३, अकोला ३, हिंगोली ७ आणि वाशिममधील एका स्टेशनचा समावेश आहे.
२४ तास उपलब्ध राहणार सीएनजी
मेच्या पहिल्याच आठवड्यात समृद्धीवरील पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन शिवणीजवळ ‘एचपीसीएल’ पंपावर सुरू होणार आहे. येथे २४ तास गॅस उपलब्ध राहणार आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ५ फिलिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन आहे. -योगेशकुमार पारधी, विदर्भ प्रमुख, अदानी टोटल गॅस.
नागपूर-बुलढाणादरम्यानही सोय
तूर्तास मे महिन्यापर्यंत सीएनजीचे एक फिलिंग स्टेशन सुरू होणार आहे. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत नागपूर ते बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत समृद्धीवर दोन्ही बाजूंनी पाच सीएनजी फिलिंग स्टेशन सुरू होणार आहेत.



