विश्वास, सुहृदयता अन् लोकउत्थानाच्या ध्येयातून बुलडाणा अर्बनची जगभरात ओळख : राधेश्याम चांडक
सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर

बुलडाणा
चार दशकांपूर्वी सुरू झालेला बुलडाणा अर्बनचा प्रवास आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारला आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले; मात्र ग्राहकांचा विश्वास, संचालक व कर्मचाऱ्यांची सुहृदयता आणि लोकउत्थानाचे ध्येय यामुळे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा बुलडाणा अर्बनचा सेवायज्ञ यापुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले.
बुलडाणा अर्बन संस्थेची ४० वी आमसभा २७ सप्टेंबर रोजी चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर येथे उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, उपाध्यक्ष विनोद केडिया, ज्येष्ठ संचालक कांतीलाल छाजेड, संचालक विनोद भंडारी, नंदकिशोर झंवर, डॉ. किशोर केला, गोपाल चिरानिया, नंदकिशोर बाहेती, दिनेश गांधी, मंजुबाई गाडगे तसेच बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमलताई सुकेश झंवर यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सहकार विद्या मंदिरच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले, तर वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शांतिपाठ केला. मागील वर्षभरात निधन झालेल्या कर्मचारी, सभासद तसेच देशातील मान्यवरांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी आपल्या मार्गदर्शनात बुलडाणा अर्बनच्या ४० वर्षांच्या वाटचालीत सभासदांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाला संस्थेने नेहमीच प्राधान्य दिले असून, यंदा सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
जागतिक आर्थिक मंदी, युद्धजन्य परिस्थिती आणि बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा यांसारखी आव्हाने असतानाही संस्थेने समाधानकारक कामगिरी केली आहे. भक्कम भागभांडवल, व्यवस्थापनातील सुधारणा आणि सुरक्षित कर्जवाटप यावर संस्थेचा भर असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. ठेवीदार, खातेदार, कर्जदार, ग्राहक आणि सभासदांच्या सहकार्यामुळे बुलडाणा अर्बनने सहकार व आर्थिक क्षेत्रात विश्वास संपादन केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून संस्थेचा कारभार अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांनी बदलत्या परिस्थितीनुसार कार्यक्षम होणे आवश्यक आहे, असे सांगत डॉ. झंवर यांनी संस्थेच्या चार दशकांच्या वाटचालीत सभासद, शेतकरी, ठेवीदार आणि ग्रामीण भागातील कास्तकारांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
संस्थेच्या वतीने प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी आणि अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ संचालक कांतीलाल छाजेड यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला.
सभासदांच्या प्रश्नांना भाईजींची उत्तरे
आमसभेत सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी उत्तरे दिली. अनेक सभासदांनी आपल्या गावात सहकार विद्या मंदिर सुरू करावे, बुलडाणा अर्बनच्या शाखा सुरू कराव्यात, अशा मागण्या मांडल्या. संस्थेला काही प्रशासकीय व नियामक मर्यादा असून, संबंधित नियमांनुसारच कामकाज करावे लागते, असे भाईजी यांनी स्पष्ट केले.
नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर बुलडाणा अर्बनने औषधसाठ्यासह वैद्यकीय पथक तेथे पाठवून सलग १५ दिवस सेवा दिली. या काळात हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आल्याचेही भाईजी यांनी यावेळी सांगितले.
‘बोले तैसा चाले’ची प्रचिती
संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते ‘BU PAY’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिरुपती, शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे अयोध्येतही बुलडाणा अर्बनचे भक्तनिवास असावे, अशी सभासद व भाविकांची मागणी होती. त्यावेळी भाईजी यांनी दिलेला शब्द पूर्ण करत बुलडाणा अर्बनने अयोध्येत रामभक्तांसाठी भक्तनिवास सुरू केला. याबद्दल भक्तनिवासाचे स्थानिक संचालक ओमप्रकाश शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाईजी यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.
आमसभेसाठी राज्यातील विविध भागांतून सभासद व ठेवीदार उपस्थित होते. तसेच मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथूनही सभासद आले होते. सभागृह परिसरात संस्थेच्या वतीने विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सना सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले. विषयसूचीचे वाचन रविंद्र कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक डॉ. किशोर केला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्यासह सर्व विभागीय व्यवस्थापक, मुख्यालयातील विभागप्रमुख व कर्मचारी तसेच सहकार विद्या मंदिरच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




