रक्तसेवेतून चिमुकल्याला जीवनदान; एकनिष्ठा फाउंडेशनच्या कार्याचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक
दुर्मिळ रक्तगटाच्या सहा रक्तदात्यांचा पुढाकार; एसपी निलेश तांबे व एसडीपीओ प्रदीप पाटील यांनी केले अभिनंदन

खामगाव
सामाजिक बांधिलकी जपत रक्तसेवेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या कार्याचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले. जळगाव जामोद येथील आदिवासी गरीब कुटुंबातील १२ वर्षीय गणेश जामरा याला दुर्मिळ एबी निगेटिव्ह रक्तगटाची तातडीने गरज असताना फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी पुढाकार घेत त्याला आवश्यक रक्त उपलब्ध करून दिले.
गणेश जामरा हा खामगाव येथील महात्मा फुले सामान्य रुग्णालयातील क्रमांक दोनच्या वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल होता. त्याचे हिमोग्लोबिन अवघे चारपर्यंत घसरले होते. त्याला एबी निगेटिव्ह रक्तगटाच्या चार रक्तदात्यांची आवश्यकता होती. मात्र, हा दुर्मिळ रक्तगट सहज उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरांनी त्याला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला होता. ही माहिती गजानन शेटे यांनी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे सुरज यादव यांना दिल्यानंतर फाउंडेशनने तातडीने रक्तदात्यांशी संपर्क साधला. आवाहनाला प्रतिसाद देत सचिन कळसकार, आशिष निळे, विजय राखोंडे, वैभव बाळापुरे, चेतन शेलकर आणि सिद्धेश चिंचोळकर यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीमुळे गणेशला आवश्यक रक्त उपलब्ध होऊन उपचारास मोठी मदत झाली.
याशिवाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या दोन महिलांना रक्त व औषधांसाठी आर्थिक मदत करण्यात आली. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेलाही दुर्मिळ ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह रक्तगटाची निःशुल्क रक्तमदत करण्यात आली. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीच्या आरतीसाठी आलेले बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सामाजिक कार्य प्रेरणादायी असून, पोलीस प्रशासन सदैव या कार्याच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सुरजभैय्या यादव यांनी फाउंडेशनच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
रक्ताची गरज, फाउंडेशनची तत्परता
दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णांसाठी वेळेत रक्तदाता मिळणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. अशा वेळी फाउंडेशनकडून रक्तदात्यांशी तातडीने संपर्क साधून गरजू रुग्णांना मदत केली जात आहे. गणेश जामरा याच्या प्रकरणातही याच तत्परतेमुळे आवश्यक रक्तदाते उपलब्ध झाले.
गरजू कुटुंबांनाही आर्थिक मदत
रक्तसेवेपुरते कार्य मर्यादित न ठेवता आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांच्या कुटुंबांना औषधे व उपचारासाठी मदत करण्याचा उपक्रमही फाउंडेशनकडून राबविला जात आहे. दोन महिलांना आर्थिक मदत तसेच प्रसूतीसाठी दाखल महिलेला निःशुल्क रक्त उपलब्ध करून देण्यात आले.



