केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले राज्य सरकारचे आभार

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बुलडाण्यातील सर्व १३ तालुक्यांचा समावेश

बुलडाणा 

पावसातील दीर्घ खंडामुळे राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिके कोमेजली, तर काही भागात पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. या तालुक्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती व मदतीचा लाभ मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा यामध्ये समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!