भारत विद्यालयात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा अन् संस्कृत दिनाचा त्रिवेणी संगम
सण-परंपरांसोबत संस्कृती संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

बुलडाणा,
भारतीय संस्कृतीतील बंधुभाव, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि संस्कृत भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारत विद्यालयात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि संस्कृत दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यालय परिसरात पारंपरिक वातावरण निर्माण झाले होते. सदर कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी दुपारी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात वर्गावर्गातून रक्षा बंधनाच्या उपक्रमाने झाली. विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधून प्रेम, आपुलकी, बंधुभाव व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. यावेळी केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता परस्परांमध्ये स्नेह, आदर व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नारळी पौर्णिमेनिमित्त विद्यालयात प्रतिकात्मक समुद्रपूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेत दुहेरी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगली. विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक व सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण करून आपल्या कलागुणांना वाव दिला. स्पर्धेचे परीक्षण रश्मी जाधव आणि दिव्या वाघोदे यांनी केले.
या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई यांच्या हस्ते हे पूजन पार पडले. समुद्र, जलसंपदा व निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आली.
संस्कृत भाषेच्या संवर्धनाचा संदेश
संस्कृत दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व, भारतीय ज्ञानपरंपरेतील तिचे योगदान तसेच या प्राचीन भाषेच्या संवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यात भाषा आणि सण-परंपरांची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
00




