जेवण करताना इसमाचा मृत्यू; ‘मदिना दरबार’चा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द
मलकापूर येथील हॉटेलमध्ये स्वच्छतेच्या त्रुटी आढळल्या; खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले

मलकापूर,
मलकापूर शहरातील ‘मदिना दरबार’ हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हॉटेलची तपासणी केली असता स्वच्छतेसह विविध बाबींमध्ये त्रुटी आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सदर हॉटेलचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश ३१ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील ‘मदिना दरबार’ हॉटेलमध्ये ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास एक इसम जेवण करत असताना त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पंचनामा करताना पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हॉटेलला भेट देऊन तपासणी केली. यावेळी रिफाइंड सोयाबीन तेल, रुमाली रोटी आणि आटा या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच मृत व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
हॉटेलच्या तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या नियमांची पूर्तता होत नसल्याचे अन्न व औषधी प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सदर व्यवसाय तत्काळ बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर या प्रकरणी घेण्यात आलेल्या सुनावणीनंतर हॉटेलचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, हॉटेलकडून तपासणीतील त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानंतर फेरतपासणी केली जाईल. फेरतपासणीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.


