जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणीत खेळाडूंचे कौशल्य
जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणीत खेळाडूंचे कौशल्य

बुलडाणा
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, बुलडाणा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या समन्वयातून तसेच मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने सातवी जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट्स निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी येथील संतुलन योग केंद्र, मयूर कुंज येथे घेण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम उपरवट व उपाध्यक्ष विलास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील योगपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धे दरम्यान ट्रॅडिशनल योगा, रिदमिक योगा, आर्टिस्टिक पेअर व आर्टिस्टिक सिंगल या विविध प्रकारांमध्ये स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले. विशेष म्हणजे १० ते ५५ वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवून योगासन क्रीडेतील उत्साहाचे दर्शन घडविले. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विजेत्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेसाठी चिखलीचे निलेश शिंगणे, खामगावच्या पूजा गायकी, मेहकरचे प्रेमदास वाकोडे, शेगावचे विनोद भारसागळे, खामगावचे आर. पी. महाजन आणि मेहकरचे प्रशांत सुरणार यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेत निश्चितच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास बुलढाणा जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिव डॉ. वैशाली निकम यांनी व्यक्त केला.
योगातून निरोगी जीवनाचा संदेश
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बुलडाण्यातील फिजिशियन तथा मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीचे सचिव डॉ. गजेंद्र निकम उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी प्राचीन योगशास्त्राच्या माध्यमातून नव्या पिढीला निरोगी जीवनाचा मार्ग मिळू शकतो, असे सांगितले. स्पर्धा केवळ विजय मिळविण्यासाठी नसून मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर होण्याचे माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.




