आईच्या निधनातूनही माणुसकीचा प्रकाश; बाहेकर कुटुंबीयांकडून नेत्रदानाचा प्रेरणादायी आदर्श

आईच्या निधनातूनही माणुसकीचा प्रकाश; बाहेकर कुटुंबीयांकडून नेत्रदानाचा प्रेरणादायी आदर्श
प्रतिनिधी | किन्होळा
आईच्या निधनाचे अपार दुःख उराशी असतानाही रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद जपत बाहेकर कुटुंबीयांनी समाजासमोर माणुसकीचा हृदयस्पर्शी आदर्श ठेवला आहे. मातोश्रींच्या मरणोपरांत नेत्रदानाचा निर्णय घेऊन त्यांनी दोन अंधांच्या जीवनात नव्या प्रकाशाची पहाट आणली. हा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.
तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी मनकर्णाबाई शेषराव बाहेकर वय ८४ यांचे ६ फेब्रुवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. या दुःखद क्षणी त्यांचे पुत्र जगदीश व भास्कर बाहेकर यांनी अंत्यसंस्कारापूर्वी मातोश्रींचे नेत्रदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. सेवानिवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी असलेले जगदीश बाहेकर हे वाशिम जिल्ह्यात नेत्रदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एकेकाळी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख दृष्टी देणारे रुग्णालय म्हणून संपूर्ण पूर्व विदर्भात निर्माण झाली होती. निवृत्तीनंतरही त्यांनी जनसेवेचे हे व्रत अविरत सुरू ठेवले असून, आईच्या निधनानंतरही त्याच निष्ठेने नेत्रदानाचा संकल्प जपला.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी पार पाडली भूमिका
दरम्यान या घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार व जिल्हा अंधत्व निवारण कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे यांना मिळताच त्यांनी पुढाकार घेत नेत्रदान प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जवाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. . यावेळी नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अमोल उगले, नेत्र चिकित्सा अधिकारी राजेंद्र देवकर, प्रवीण सोलंकी तसेच समुपदेशक योगेश सिरसाठ यांनी तातडीने कार्यवाही केली.

मृत्यु नंतर ही दिसेल जग
मृत्यूनंतरही आपल्या मातोश्रींचे डोळे या जगाकडे पाहत राहतील या भावनेतून बाहेकर कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाचे किन्होळा परिसरासह आरोग्य क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. शोकसागरात असतानाही समाजहिताला प्राधान्य देणारा हा संदेश खऱ्या अर्थाने माणुसकीची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला आहे.

000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!