खळबळजनक- फास्टॅग बंद करण्याच्या बहाण्याने निवृत्त शिक्षिकेला ३.३१ लाखांचा ऑनलाइन गंडा
टोल फ्री क्रमांकाच्या नावाखाली सायबर भामट्यांचा सापळा; APK फाइल डाउनलोड करताच बँक खात्यावर डल्ला

बुलडाणा
वाहनाचा फास्टॅग बंद करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी एका निवृत्त शिक्षिकेची तब्बल ३ लाख ३१ हजार ६१३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुगलवर टोल फ्री क्रमांक शोधणे, त्यानंतर अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन, बँक खात्याची गोपनीय माहिती मिळविणे आणि APK फाइल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगणे, अशा पद्धतीने हा सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर भामट्यांनी डल्ला मारल्याने संबंधित शिक्षिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
संबंधित महिला सन २०२३ मध्ये शिक्षिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या असून, त्यांना सध्या पेन्शन मिळते. त्यांचे येथील कॅनरा बँकेत खाते असून, त्यामध्ये ३ लाख ३३ हजार रुपये जमा होते. या खात्याला त्यांचा मोबाईल क्रमांक जोडलेला होता. त्या फोन-पेचा वापरही करीत होत्या. दरम्यान, त्यांच्याकडे असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच ३०, एटी १४२० त्यांनी घटनेच्या आठ ते दहा दिवसांपूर्वी विकली होती. मात्र, वाहनाचा फास्टॅग त्यांच्या नावावर असल्याने त्यातून टोलचे पैसे कपात होत असल्याचे संदेश त्यांच्या मोबाईलवर येत होते. त्यामुळे फास्टॅग बंद करण्यासाठी त्यांनी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुगलवर टोल फ्री क्रमांक शोधून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पहिला फोन कट झाल्यानंतर काही वेळातच त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने फास्टॅगची माहिती विचारून कोणत्या बँकेतून रिचार्ज केले जाते, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित महिलेने स्टेट बँक ऑफ इंडियातून फास्टॅग रिचार्ज करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर कॅनरा बँकेचाही उल्लेख झाल्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने खात्याचा क्रमांक, कार्डची माहिती आणि कार्डवरील तीन अंकी सुरक्षा क्रमांक मागितला. फास्टॅग बंद करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे समजून महिलेने संबंधित व्यक्तीला बँक खात्याचा तपशील आणि कार्डची गोपनीय माहिती दिली. यापुढे फास्टॅगचे संदेश येणार नाहीत आणि पैसेही कपात होणार नाहीत, असे आश्वासन फोन करणाऱ्याने दिले.
APK फाइल उघडताच खात्यातून रक्कम गायब
९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरून फोन आला. बँकेत जमा झालेले पैसे तपासण्यासाठी APK फाइल पाठविल्याचे सांगून ती उघडण्यास सांगण्यात आले. संबंधित महिलेने ती फाइल उघडून पाहिली; मात्र त्यामध्ये काहीही समजत नसल्याने ती बंद केली. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे कपात झाल्याचे संदेश आले. त्यामुळे त्यांनी कॅनरा बँकेच्या शाखेत जाऊन खात्याचे विवरणपत्र तपासले. त्यावेळी त्यांच्या खात्यातून तब्बल ३ लाख ३१ हजार ६१३ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे व्यवहार ‘SWIGGY INSTAMART PRIVATE LIMITED’ या नावाने झाल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आले.
अनधिकृत UPI व्यवहारांमुळे मोठा आर्थिक फटका
तक्रारीतील माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी संबंधित बँक खात्यावर यूपीआय सुविधा सक्रिय करून महिलेच्या परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार करण्यात आले. अनोळखी व्यक्तींनी मोबाईलमधील माहितीचा गैरवापर करून ओटीपी व बँक व्यवहारांशी संबंधित गोपनीय तपशील मिळविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. फास्टॅग बंद करण्याच्या साध्या प्रक्रियेसाठी संपर्क साधलेल्या निवृत्त शिक्षिकेला सायबर भामट्यांनी विश्वासात घेऊन मोठ्या रकमेचा गंडा घातला. या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींना बँक तपशील देण्याचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या!
अनोळखी व्यक्तीने फोन करून बँक खात्याचा तपशील, डेबिट कार्डचा सीव्हीव्ही, पिन किंवा ओटीपी विचारल्यास कोणत्याही परिस्थितीत ही माहिती देऊ नये. फास्टॅग बंद करणे, रिचार्ज करणे किंवा पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली पाठविलेल्या APK फाइल किंवा अनोळखी लिंक उघडू नयेत. बँक किंवा अधिकृत सेवा पुरवठादार अशा प्रकारे गोपनीय माहिती मागत नाहीत. खात्यातून अनधिकृत रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच तातडीने बँकेशी संपर्क साधून व्यवहार रोखण्याचा प्रयत्न करावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरित तक्रार नोंदवावी किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार दाखल करावी.



