दिवाळीच्या दिवशी गुगळी येथे शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

धामणगाव बढे | एस. बी. शेख
दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना गुगळी येथील एका शेतकरी कुटुंबावर मात्र मोठे संकट ओढवले. शेतकरी गुणवंतराव गणेशराव देशमुख यांच्या शेतातील गोदामाला अचानक आग लागून लाखो रुपयांचा शेतमाल आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे देशमुख कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
या आगीत गोदामात साठवून ठेवलेला २२ क्विंटल कापूस, १४ क्विंटल गहू, ६ क्विंटल मका, चार एकर क्षेत्रासाठीचा ठिबक सिंचन संच आणि चार ट्रॉली कुट्टी चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वर्षभर कष्ट करून पिकविलेला शेतमाल आणि शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धामणगाव बढे पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व पंचनामा केला. ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शैलेश राजपूत आणि पोलीस कॉन्स्टेबल डागोर यांनी आवश्यक कार्यवाही केली.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्याच्या कष्टाची कमाई आगीत भस्मसात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा करावा. तसेच बाधित शेतकरी गुणवंतराव देशमुख यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




