जिल्ह्यात होणार मुरघासची निर्मिती
चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन; शेतकऱ्यांना चारा लागवड व साठवणुकीसाठी प्रोत्साहन

बुलढाणा,
संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. खरीप हंगामानंतर उपलब्ध होणारे सोयाबीन, तूर व अन्य पिकांचे अवशेष पशुखाद्यासाठी उपयोगात आणण्यासोबतच हिरव्या चाऱ्याची साठवणूक करून भविष्यातील गरज भागविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीचे प्रशिक्षण देऊन चारा लागवड वाढवावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेता पशुधनासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून चारा लागवड आणि जलसंधारणाच्या कामांना चालना द्यावी. पशुसंवर्धन विभागाने वितरित केलेल्या चारा बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे का, याची पडताळणी करावी. लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार व अन्य पीक अवशेष संकलित करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करत मुरघास निर्मिती आणि चारा साठवणुकीकडे विशेष लक्ष द्यावे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह अन्य चारा पिकांची लागवड करावी, असेही जाधव यांनी सांगितले.
मुरघास निर्मितीसाठी जनजागृती
जनावरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी हिरव्या चाऱ्याचे योग्य पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे. मुरघास निर्मिती, चाऱ्याची साठवणूक आणि उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण द्यावे. पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा साठा लक्षात घेऊन भविष्यातील गरजेनुसार नियोजन करावे. टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास चारा छावण्या सुरू करण्यासाठीही प्रशासनाने पूर्वतयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जलसंधारणाच्या कामांनाही गती
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदी, नाले व तलावांचे खोलीकरण, तलावांमधील गाळ काढणे, शेततळ्यांची निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच पाणी शुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता, वीजपुरवठा आणि तांत्रिक देखभाल याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.




