धोकादायक विहिरीत पडलेल्या वासराला गौसेवकांनी दिले जीवदान
सुरक्षेचा अभाव; विहिरीची दुरुस्ती करून संरक्षक जाळी बसविण्याची नागरिकांची मागणी

खामगाव,
चांदमारी फैल परिसरातील भट्टड ले-आउटमध्ये उघड्या व मोडकळीस आलेल्या खोल विहिरीत पडलेल्या वासराला गौसेवकांनी अथक प्रयत्नांतून सुखरूप बाहेर काढले. मंगळवारी (दि. ३) सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील धोकादायक विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भट्टड ले-आउटमधील मोकळ्या जागेत असलेली ही जुनी विहीर पूर्णतः ढासळलेल्या अवस्थेत आहे. विहिरीत मोठे झाड पडले असून मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. विहिरीभोवती केवळ सिमेंटच्या खांबांचे तारकुंपण करण्यात आले असून तेही तुटलेल्या अवस्थेत आहे. शेलोडी गावाकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्यालगत असलेली ही विहीर नगर परिषदेच्या हद्दीत येते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगळवारी सकाळी लाल रंगाच्या गाईचे वासरू या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गौसेवक सूरजभैय्या यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोरीच्या साहाय्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने बचावकार्य राबवून खोल विहिरीत अडकलेल्या वासराला सुखरूप बाहेर काढले. या मोहिमेत गोलू शर्मा, अविनाश इंगळे आणि शिवम दिवटे यांनी सहकार्य केले. तसेच नगर परिषदेचे कर्मचारी महेश राठोड, उमेश चावरे, रुपेश सारसर, मयूर धेडुंदे यांच्यासह अग्निशमन दलाचे वाहनचालक वसंता घोंगे आणि नितीन भातखेडे हे अग्निशमन वाहनासह मदतीसाठी दाखल झाले. सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वासराचे प्राण वाचले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने सदर विहिरीची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विहिरीची दुरुस्ती व पुनर्वसन करून तिच्यावर मजबूत लोखंडी संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी फाउंडेशनसह नागरिकांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत विहिरीचा उपयोग पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी करता येईल, अशा दृष्टीनेही प्रशासनाने प्रयत्न करावेत. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन अविनाश इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



