४० वर्षांची यशोगाथा आता टपाल आवरणावर; बुलडाणा अर्बनचा गौरव
संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भारतीय डाक विभागाकडून विशेष आवरणाचे अनावरण

बुलडाणा
बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीची दखल आता भारतीय डाक विभागाने घेतली आहे. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुलडाणा अर्बनच्या कार्याचा गौरव करणाऱ्या विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. गोवर्धन हॉल येथे झालेल्या सोहळ्यात संस्थेच्या प्रवासाची फिलाटेली परंपरेत नोंद झाली.
या कार्यक्रमाला बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, उपाध्यक्ष विनोद केडिया, संचालक गोपाल चिरानिया, नागपूर क्षेत्राचे सहाय्यक निदेशक डाक सेवा जयंत दाऊ, बुलडाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
१९८६ मध्ये अवघ्या १२ हजार रुपयांच्या प्रारंभिक भांडवलातून आणि ७२ सभासदांच्या सहभागातून सुरू झालेल्या बुलडाणा अर्बनने चार दशकांत मोठा विस्तार केला. आज संस्थेचे चार राज्यांमध्ये ४८३ शाखांचे जाळे असून ४१० गोदामांची व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. आर्थिक क्षेत्रातील कामकाजासोबतच सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत. तिरुपती, अयोध्या, माहूरगड, शिर्डी, पंढरपूर आणि तुळजापूर येथे भाविकांसाठी भक्तनिवास उभारण्यात आले आहेत.
भारतीय डाक विभागाकडून विशेष व्यक्ती, संस्था किंवा महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या स्मृती जतन करण्यासाठी विशेष टपाल आवरण जारी केले जाते. त्यामुळे बुलडाणा अर्बनच्या चार दशकांच्या प्रवासाला मिळालेले हे विशेष आवरण संस्थेच्या कामगिरीची अधिकृत नोंद म्हणून महत्त्वाचे ठरणार आहे. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या योगदानालाही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.
ग्राहकांशी सातत्यपूर्ण संवाद, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर बुलडाणा अर्बनने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. भारतीय डाक विभागाच्या वतीने संस्थेच्या चार दशकांच्या वाटचालीचे अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, राधेश्याम चांडक यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा अर्बनने भविष्यातही प्रगतीची वाटचाल कायम ठेवावी, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून बुलडाणा अर्बनची चार दशकांची वाटचाल आता एका ऐतिहासिक दस्तऐवजाच्या स्वरूपात जतन झाली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थेच्या योगदानाची नोंद टपाल विभागाच्या फिलाटेली परंपरेत झाल्याने हा क्षण संस्थेसाठी विशेष ठरला.



