मुस्लिम कब्रस्तानात अशोकाची १०० रोपे; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

धामणगाव बढे
येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अशोकाची तब्बल १०० रोपे लावण्यात आली. मुसा भाई ठेकेदार यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या साल्याप गँगमधील मजूर वर्गाच्या सहकार्याने हा स्तुत्य वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.
कब्रस्तान परिसरात हिरवाई वाढावी, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि भावी पिढीला स्वच्छ व सुंदर वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, मुसा भाई ठेकेदार यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या हाताने अशोकाच्या रोपांची लागवड केली.
यावेळी मजीद बागवान, मुसा खा बुडन खा, अल्ताफ खा, अलीम खा, नासिर बागवान, बबलू शेख, अल्ताफ शेख, अफसर खा, सलमान शेख यांच्यासह साल्याप गँगमधील मजूर वर्गाने परिश्रम घेतले.
वृक्षारोपणासोबत संगोपनाचीही जबाबदारी
केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे, असा पर्यावरणपूरक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे धामणगाव बढे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




