खामगावचे सुरज यादव यांना राष्ट्रीय ‘चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान’

खामगाव
थॅलेसेमिया, सिकलसेल तसेच रक्तदान जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खामगाव येथील एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना मध्य प्रदेशातील नलखेडा येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान-२०२६’ प्रदान करण्यात आला.
आई बगलामुखी धाम, नलखेडा येथील सरस्वती शिशु विद्या मंदिरात रक्तदान महादान मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देशातील १५ राज्यांतील रक्तदूतांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, गुजरात, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आसाम, सिक्कीम व हरियाणा येथील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आई बगलामुखी मंदिरापासून रक्तदान जनजागृती रॅलीने झाली. तिरंगा ध्वज आणि देशभक्तीपर गीतांनी रॅलीला विशेष आकर्षण मिळाले. त्यानंतर बैजनाथ ब्लड बँक, आगर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सुरजभैय्या यादव यांनी रक्तदान चळवळीसह थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी एकनिष्ठा फाऊंडेशनचे सहकारी गोपाल सायखेडे व उमेश पांडे उपस्थित होते.



