१०० मीटरच्या तिरंग्याने लोणार शहर दुमदुमले; ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य रॅली

लोणार
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासोबतच ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोणार शहरात शुक्रवारी (दि. १४) भव्य १०० मीटर तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तब्बल १०० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थी, युवक, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’च्या घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला.
कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने, कै. कमलाबाई क. बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय तसेच लोणार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली पार पडली.
रॅलीला तहसीलदार भूषण पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करून दिली. यावेळी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू, सामाजिक कार्यकर्ते शुभम बनमेरू, शुभम देसाई, शुभम भगत, विनोद थोरवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच शहरातील युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. रॅली मार्गावर नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागींचे कौतुक केले.
तब्बल १०० मीटर लांबीच्या तिरंग्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी नागरिकांना आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकविण्यासोबतच राष्ट्रध्वजाचा सन्मान व प्रतिष्ठा कायम राखण्याचे आवाहन केले.
राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यावर भर
‘हर घर तिरंगा’ अभियान केवळ घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि देशाप्रती कर्तव्याची भावना निर्माण करणारे ठरावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे लोणार शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



