आ. संजय गायकवाड, आ. श्वेता महाले यांची ‘क्रॉस एंट्री’
राजकिय प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी शक्तिप्रदर्शन

बुलडाणा
भाजपच्या पक्षविस्ताराच्या राजकारणाला आता मतदारसंघांच्या सीमारेषाही उरलेल्या नाहीत, असे चित्र बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर जाऊन पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेत भाजपचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे देखील आता १५ ऑगस्ट रोजी चिखली येथील परमहंस मौनी बाबा मठ येथे सकाळी ११ वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात दोन्ही आमदारांची ‘क्रॉस एंट्री’ चर्चेचा विषय ठरली आहे.
आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकाराने नुकताच देऊळगावराजा परिसरात भाजपचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय मंडळींची उपस्थिती होती. महाले यांनी आपल्या मतदारसंघापुरते राजकारण मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील इतर भागातही पक्षाची ताकद वाढविण्याची भूमिका घेतल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. मात्र, आता याच राजकीय वाटेवर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनीही पाऊल टाकले आहे. १५ ऑगस्ट रोजी चिखली विधानसभा मतदारसंघात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे चिखलीत महाले आणि बुलडाण्यात गायकवाड अशी पारंपरिक मतदारसंघीय राजकीय चौकट काही प्रमाणात बाजूला पडताना दिसत आहे.
‘ मतदारसंघाला बळ’ की ‘पक्षाचा विस्तार’?
दोन्ही आमदारांकडून होणाऱ्या या हालचालींकडे केवळ पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने न पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे. स्थानिक पातळीवर भाजपचे अधिकाधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या प्रवाहात आणणे, विरोधकांच्या संघटनात्मक ताकदीला छेद देणे आणि आगामी निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे मजबूत करणे, हा या घडामोडींचा संभाव्य राजकीय हेतू मानला जात आहे. राजकारणात प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करणे अपेक्षित असते. मात्र, सध्या बुलडाणा जिल्ह्यात त्यापुढे जात एका मतदारसंघातील आमदार दुसऱ्या मतदारसंघात आणि दुसऱ्या मतदारसंघातील आमदार तिसऱ्या भागात पक्षविस्तारासाठी सक्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या हालचालींमागे केवळ संघटनवाढ आहे की आगामी राजकीय प्रभावक्षेत्र वाढविण्याची चाचपणी, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आ. महाले यांच्या कार्यक्रमानंतर आ. गायकवाडांची घुसखोरी
श्वेता महाले यांच्या देऊळगावराजा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर आता संजय गायकवाड पुन्हा एकदा चिखली मतदार संघात घुसखोरी करत १५ ऑगस्ट रोजी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेत आहे. दोन्ही नेत्यांनी पक्षविस्ताराची भूमिका घेतली असली तरी त्यांच्या मतदारसंघाबाहेरील सक्रियतेमुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघाच्या राजकारणात सहसा स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिले जाते. बाहेरील नेत्यांनी स्थानिक पातळीवर सक्रिय होणे हे अनेकदा राजकीय संदेश देणारे ठरते. त्यामुळे महाले आणि गायकवाड यांच्या या ‘क्रॉस एंट्री’कडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.
000




