मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर महालेची बंदूक

दबावाच्या राजकारणाला चढतोय रंग
बुलडाणा,
जिल्ह्याच्या राजकारणात दबावाच्या राजकारणाला आता चांगलाच रंग चढू लागला आहे. बुलडाणा ते चिखली मतदार संघात आप आपली पावर दाखवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय निशाणा साधण्याची रणनीती सुरू झाली आहे का, असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. महाले यांच्या भूमिकेमुळे या सगळ्या घडामोडींना नवे वळण मिळाले असून, त्यांच्या राजकीय हालचालींच्या आड नेमके कोणाचे हितसंबंध आणि कोणाचा दबाव आहे, याची चर्चा रंगू लागली आहे.
नुकतेच चिखली येथील भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पतिदेव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक विद्याधर महाले यांच्या वाढदिवसा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्याधर महाले, आ. श्वेता महाले यांचे बॅनर नव्हे तीस फुट उंच उंच कट आउट लावण्यात आले आहे. हे कट आउट नेमके याच ठिकाणी का लावण्यात आले आहे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील चौक, कारंजा चौक, अथवा संगम चौकात का लावण्यात आले नाही, याचे उत्तर सर्व राजकारण्यांना ज्ञात आहे.
नुकतेच आमदार सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस चिखली येथे धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. यावेळी मोठी रॅली, हार, कार्यक्रम असा दिमाखात कार्यक्रम पार पडला आहे. याचे कारण ही तसेच आहे, मागील काही महिन्यापासून आ. गायकवाड हे आपल्या पुत्रासाठी राजकिय आखाडा तयार करत आहे. चर्चा आहे की ते चिखली येथून मैदानात उतरणार आहे, करीता सदर प्रपंच सुरु असल्याचे कळते.
दरम्यान १ सप्टेबर रोजी विद्याधर महाले यांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस चिखली येथे दिमाखात साजरा होणे अपेक्षीत असतांनाच महाले परिवाराने सदर कार्यक्रम बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. हा कार्यक्रम म्हणजे अप्रत्यक्ष मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसाचे उत्तरच नव्हे तर मृत्युंजयच्या पुढील वाटचालीस विरोध दाखवण्यासाठी असल्याचे दबक्या आवाजात भाजप कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे. यासाठी बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात, विद्याधर महाले, आ. श्वेता महाले कट आउट अपेक्षीत होते, मात्र या मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ही कट आउट मध्यरात्री दरम्यान उभे करण्यात आले, त्याला काही धर्मवीर समर्थकांनी विरोध ही केला त्यावरुन भाजपच्यावतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाण्यातील शिवसेनेत वातावरण तापल्याची माहिती आहे, या खेळीत महाले परिवाराने एक चाल जास्तीची खेळून आ. संजय गायकवाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट आउट लावून. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने व सत्तेत सोबत असल्याने आ. गायकवाड यांना या कट आउटला विरोध करणे जड जात आहे. अन्यथा झुकेगा नही म्हणणाऱ्या आ. गायकवाड यांच्या समर्थकांना शहरात कोणते कट आउट ठेवायचे व कोणते नाही हे सांगायची गरज पडत नाही.
दरम्यान महाले परिवाराच्यावतीने मुख्यमंत्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून आ. गायकवाड यांच्या काळजावर नेम साधला साधला असल्याची चर्चा जोर पकडत आहे.




