आ. संजय गायकवाड यांची खळबळजनक प्रतिक्रिया; आज
भाजप जिल्हाध्यक्षाचा १०० कोटीचा दावा ; व्यक्तिगत राजकारणामुळे जिल्हयात युतीला तडा

बुलडाणा
जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आता मानहानीच्या दाव्यापर्यंत पोहोचले आहे. शिंदे यांनी आ. गायकवाड यांच्यावर आदिवासी मुलीशी संबंधित वक्तव्य केल्या प्रकरणी १०० कोटी रुपयाचा अब्रु नुकसानीचा दावा केल्याने जिल्हयातील राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात आ. संजय गायकवाड हे व्यस्त असल्याने या प्रश्नाला बुधवारी उत्तर देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हयातील त्यांच्या चाहत्यांच्या नजरा त्यांच्या खळबळजनक प्रतिक्रिये कडे लागल्या आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. यात त्यांच्या आश्रमशाळेवरील मुलींशी संबंधित वादग्रस्त वक्तव्यांचा समावेश होता. या आरोपांनंतर विजयराज शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संबंधित आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले असून माफी न मागितल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन्ही नेत्यांमधील संघर्ष हा केवळ वैयक्तिक राहिलेला नसून त्याचे पडसाद महायुतीच्या स्थानिक राजकारणावर उमटत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे मतभेद दिसून येत आहेत. महायुतीचे घटक पक्ष एकत्र सत्तेत असले तरी बुलढाण्यात मात्र वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनेही आक्रमक भूमिका घेत दोन्ही नेत्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हा संघर्ष अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. वरिष्ठ पातळीवरून समेटाचे प्रयत्न झाले नाहीत तर त्याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आ. गायकवाड उत्तर देणार आज
खळबळजनक वातावरण निर्मितीसाठी आ. गायकवाड प्रसिध्द आहे. बेधडक व बेलगाम उत्तर देण्याचा त्यांचा हातखंड आहे.
या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारल्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या बददल आपण बुधवारी उत्तर देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आ. गायकवाड नेमके काय प्रतिक्रिया देतील याकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे.




