२२ की ४९ किलोमीटर? मोताळ्यासाठी बुलढाणाच सोयीचा
मोताळ्याच्या जनहितासाठी बुलढाणा कार्यक्षेत्र कायम ठेवा - जयश्री शेळके

बुलडाणा
प्रस्तावित खामगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोताळा तालुक्याचा समावेश न करता तो बुलडाणा कार्यक्षेत्रातच कायम ठेवावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी अमरावती विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नावे सविस्तर निवेदन सादर करत नागरिकांच्या सोयीचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी केली.
राज्यात प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या उद्देशाने खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावात मोताळा तालुक्याचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरणार असल्याचे ॲड. शेळके यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यांनी सांगितले की, मोताळा ते बुलढाणा हे अंतर अवघे २२ किलोमीटर असून खामगावचे अंतर सुमारे ४९ किलोमीटर आहे. त्यामुळे महसूल व इतर प्रशासकीय कामांसाठी बुलढाणा हेच मोताळ्यातील नागरिकांसाठी अधिक सोयीचे ठिकाण आहे. शैक्षणिक, वैद्यकीय तसेच विविध शासकीय कामांसाठीही तालुक्यातील नागरिकांची नियमित ये-जा बुलढाण्याकडेच असते. मोताळा तालुका खामगाव कार्यक्षेत्रात गेल्यास नागरिकांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढण्याबरोबरच प्रशासकीय कामांसाठी अनावश्यक अडचणी निर्माण होतील. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशालाच यामुळे बाधा पोहोचेल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. स्थानिक नागरिकांच्या भावना, भौगोलिक वास्तव आणि जनहित लक्षात घेऊन मोताळा तालुका बुलढाणा कार्यक्षेत्रातच कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्तांसोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून शासनाकडे यासंदर्भातील सविस्तर अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याची माहिती ॲड. जयश्री शेळके यांनी दि
ली.




