लखीशाह, सेवागड तांड्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा

स्वतंत्र महसुली गावांच्या दर्जासाठी जिल्हास्तरीय समितीची मान्यता; पुढील प्रशासकीय कार्यवाहीला गती

बुलडाणा

बंजारा समाजाच्या तांडा वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लोणार तालुक्यातील लखीशाह तांडा व सेवागड तांडा यांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही तांड्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा होण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजने अंतर्गत तांडा वस्त्यांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ‘सेवा पंधरवाडा’ अभियानांतर्गत लोणार तालुक्यातील मौजे गंधारी येथील लखीशाह तांडा व मौजे सावरगाव मुंढे येथील सेवागड तांडा यांना स्वतंत्र महसुली गाव घोषित करण्यासंदर्भातील प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, मेहकर यांच्यामार्फत समितीसमोर सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांवर विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही तांड्यांना नव्याने महसुली गावाचा दर्जा देण्याच्या पुढील कार्यवाहीस समितीने मान्यता दिली. दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या तांडा वस्त्यांना महसुली गावाचा दर्जा मिळावा आणि त्याठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यावरही बैठकीत चर्चा झाली. समितीचे अशासकीय सदस्य डॉ. प्रशांत गलसिंग राठोड (मेहकर) व दीपक शिवसिंग साबळे (तरोडा, ता. मोताळा) यांनी यासंदर्भात विविध मुद्दे मांडले. या बैठकीला समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड, लोणार तालुकास्तरीय समितीचे सदस्य दिलीप राठोड उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी मेहकर, तहसीलदार लोणार आणि गटविकास अधिकारी लोणार सहभागी झाले होते.
लखीशाह आणि सेवागड तांड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेला मिळालेल्या या मान्यतेमुळे स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधा, प्रशासकीय कामकाज आणि विकासाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!