ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून विकासाला दिशा देणारी प्रक्रिया आहे – भुषण पाटील तहसीलदार

जनगणना २०२७ साठी गायखेड येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण; तहसीलदार भुषण पाटील यांचा पुढाकार

 

 

लोणार | प्रतिनिधी

“जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून शासनाच्या विविध विकास योजना, निधी वाटप, शैक्षणिक व आरोग्य सुविधा तसेच पायाभूत विकासासाठी दिशा ठरविणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन तहसीलदार भूषण पाटील यांनी केले.

ते, शहरात आयोजित जनगणनेच्या प्रशिक्षण दरम्यान बोलत होते.  हा कार्यक्रम गायखेड परिसरात पार पडला.   यावेळी फिल्ड ट्रेनर भानुदास ताठे, संदीप गायकवाड, ज्ञानेश्वर चनखोरे व रामेश्वर सानप यांनी सक्रिय सहभाग घेत प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून प्रशिक्षण दिले.  या प्रशिक्षणाची विशेष बाब म्हणजे एचएलओ ट्रेनिंग ॲपचा वापर करून डिजिटल पद्धतीने जनगणना कशी करावी, याचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरांमध्ये जाऊन माहिती कशी संकलित करावी, नागरिकांशी संवाद कसा साधावा, तसेच अचूक व संपूर्ण माहिती नोंदविण्यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान माहिती संकलनातील अचूकता, डेटा सुरक्षितता, वेळेचे नियोजन तसेच संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांकडून माहिती घेताना संवेदनशीलता, संयम आणि विश्वासार्हता राखणे अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.फिल्ड ट्रेनरांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे प्रगणक व पर्यवेक्षकांच्या शंकांचे निरसन केले. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाची सखोल समज प्राप्त झाली असून, आगामी जनगणना मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
या उपक्रमामुळे लोणार तालुक्यात जनगणना २०२७ प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!