शेलाूपूर नदी खोलीकरण व बंधारा कामांची आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्याकडून पाहणी
जलसंपन्नतेचा पाया मजबूत होणार; बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या सूचना

मोताळा,
तालुक्यातील शेलापूर येथे सुरू असलेल्या नदी खोलीकरण आणि बंधारा बांधकामाच्या कामांची आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कामांच्या प्रगतीची माहिती घेत आमदार गायकवाड यांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, शेलापूर परिसरात सुरू असलेले नदी खोलीकरण आणि बंधारा बांधकाम हे भविष्यातील जलसंपन्नतेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या कामांमुळे नदीची पाणी साठवण क्षमता वाढेल तसेच परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल. परिणामी शेतकरी, नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहणीदरम्यान आमदार गायकवाड यांनी सुरू असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून त्याची उंची वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाधिक पाणी साठवणूक होऊन त्याचा लाभ गावासह परिसरातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा विचार करून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शेलापूर गावात पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाणी गावात शिरण्याची समस्या अनेक वर्षांपासून निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र नदी खोलीकरणामुळे पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत होणार असून भविष्यात संरक्षण भिंत उभारण्यात येणार असल्याने गावात पाणी शिरण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत आमदार गायकवाड यांनी संबंधित कंत्राटदारांना दर्जेदार आणि टिकाऊ काम करण्याच्या सूचना दिल्या. शासनाचा निधी हा जनतेचा पैसा असल्याने प्रत्येक विकासकाम उच्च दर्जाचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेलापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे शेलापूरसह परिसरातील गावांच्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाला चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



