मध्यप्रदेशातून बुलडाण्यात गुटख्याची तस्करी ; ५० लाखांचा गुटखा जप्त
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर अन्न व औषधी विभाग अर्लट मोडवर

शेगाव
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैध गुटखा तस्करी मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. अन्न व औष्ध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नुकतेच गुटखा तस्करावर मकोक्का लावण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग एकदम अलर्ट मोडवर आला आहे. सदर विभागाने बुऱ्हाणपूर ते वरवट बकाल मार्गावर अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे ५० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले असून एकूण ७० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही १३ जून रोजी रात्री ९.३० च्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, बुऱ्हाणपूर-वरवट बकाल मार्गाने अकोला-यवतमाळकडे एका मालवाहू वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील यादव बेकरीसमोर नाकाबंदी केली. रात्री सुमारे १०.१० वाजता संशयित अशोक लेलँड मालवाहू वाहन (MH-40-GT-2965) थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनचालक सुरुर अहमद नूर अहमद (वय ३७, रा. अकोला) याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय वाढला. त्यानंतर वाहनाची सखोल तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. या कारवाईत ‘बाजीराव गोल्ड’, ‘मस्तानी टोबॅको’, ‘नजर १०००’, ‘एन-०५ प्रीमियम च्युइंग टोबॅको’, ‘प्रीमियम नजर ९०००’ यांसह विविध ब्रँडचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५० लाख १३ हजार ९२० रुपये असून वाहनाची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पीएसआय सुनील राऊत, पोहेकॉ सुधाकर थोरात, योगेश कुंवारे व पोलीस शिपाई मंगेश सोळंके यांनी सहभाग घेतला. पुढील तपासासाठी संबंधित वाहन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून अन्न व औषध प्रशासन विभाग, बुलढाणा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.



