लोणारात पेट्रोल डिझेल तुटवड्याची अफवा; ‘पेट्रोल कॅन’ला आले ‘अच्छे दिन’,

लोणार
लोणार शहर आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा होणार असल्याच्या अफवांनी सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, तालुक्यातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, या संपूर्ण गोंधळात शहरातील प्लास्टिक विक्रेते आणि हार्डवेअर दुकानदारांचे ‘अच्छे दिन’ आले असून, इंधन साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘प्लास्टिक कॅन आणि डब्यांची’ विक्री कमालीची वाढली आहे.
पंपांवर जाण्यापूर्वी अनेक वाहनधारक ५ ते ४० लीटरचे प्लास्टिक कॅन खरेदी करण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत धाव घेत आहेत. वर्षभर दुकानाच्या कोपऱ्यात पडून राहिलेले रिकामे डबे आणि प्लास्टिकचे कॅन काही तासांतच विकले गेल्याने विक्रेत्यांचा मोठा फायदा झाला आहे. अचानक वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी ५ आणि १० लीटरच्या कॅनची दुप्पट किमतीत विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
‘इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवांवर विश्वास ठेवू नका!’
तालुक्यातील पेट्रोल पंप चालकांनी आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी केवळ अफवांना बळी पडून कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून ठेवण्याची घाई करू नये, कारण यामुळे अपघाताची आणि आगीची भीती मोठ्या प्रमाणावर वाढते.



