खरीप हंगामाच्या तोंडावर पेट्रोल पंपावर ‘सेटिंग’चा बाजार

 शेतकऱ्यांना डिझेल देण्यास नकार; परिचितांना मात्र मागच्या दाराने पुरवठा

मेहकर
खरीप हंगामाच्या तोंडावर मेहकर व लोणार तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नागरणी, वखरणीची लगबग सुरू असताना पेट्रोल पंपांवर डिझेल – पेट्रोल वितरणात मोठा गोंधळ उडाला आहे. ‘सेटिंग’ असणाऱ्यांनाच मागच्या दाराने इंधन मिळत असून, सर्वसामान्य शेतकरी व वाहनधारकांना तासन‌‌्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सकाळपासून पेट्रोल पंपांवर प्रतीक्षा करत आहेत. मात्र ‘डिझेल संपले’, ‘स्टॉक कमी आहे’ अशी कारणे देत त्यांना परत पाठवले जात असल्याची तक्रार आहे. दुसरीकडे काही ठराविक वाहनांना किंवा ओळखीच्या लोकांना सहजरित्या मागच्या दाराने डिझेलचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे.
सुलतानपूर परिसरात एक ते दोन किलोमीटर अंतरावर तीन मार्गांवर पाच पेट्रोल पंप आहेत. तसेच जवळच अंजनी खुर्द येथे एक पेट्रोल पंप आहे. या पंपांवर कमी – अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांकडून सांिगतले जात आहे. पेट्रोल पंपांवर ठणठणाट असताना शहरातील खासगी दुकानांवर मात्र चढ्या दराने डिझेल – पेट्रोलची अवैधरित्या विक्री होत असल्याने कृत्रिम टंचाईचा संशय बळावला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पेट्रोल पंपावर उपलब्ध व शिल्लक इंधनसाठा किती याबाबत नियमित नोंद, स्टॉक रजिस्टर किंवा माहिती फलक दर्शनी भागात दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात डिझेल उपलब्ध आहे की कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शेतकरी व सर्वसामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने सर्व पेट्रोल पंपांची तपासणी करावी, इंधन साठ्याची दैनंदिन माहिती फलकावर जाहीर करणे बंधनकारक करावे, तसेच खरीप हंगामासाठी शेतीकामाच्या ट्रॅक्टरना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
..
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण
अंजनी खुर्द येथील कालिंका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. शेतीच्या नागरणीसाठी शिवणीपिसा येथील शेतकरी उद्धव साहेबराव पिसे आज, दि. १७ रोजी सकाळी पंपावर गेले असता कर्मचाऱ्यांनी “निघा येथून जा” असे म्हणत त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांनी तातडीने पेट्रोल पंपावर पोहोचून या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच पंपावरील रेकॉर्ड व इतर कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती नायब तहसीलदार डोळे यांनी दिली.
..
मेहकर पोलिसांची मध्यस्थी
पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांकडून शेतकरी उद्धव पिसे यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच मेहकर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे, पोलिस हेड काँस्टेबल शिवानंद केदार, राजेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांची समजून घालून शांत केले. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिससूत्रांनी दिली.
..
कृत्रिम इंधन टंचाई
ऐन शेती मशागतीच्या हंगामात वाढते इंधनाचे दर सहजरित्या शेतकऱ्यांच्या व वाहनधारकांच्या अंगवळणी पडावेत, यासाठी इंधन कंपन्यांना हाताशी धरून कृत्रिम इंधन टंचाई निर्माण केली जात आहे. हा प्रकार टाळून शेतकरी व सर्वसामान्यांना सुरळीतपणे इंधन पुरवठा करण्यात यावा.
* महेंद्र पनाड,
शेतकरी तथा नेते, वंचित बहुजन आघाडी

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!