शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा असेल तर हजार वेळा लढेन! – शुभम घोंगटे

  1. धामणगाव बढे

मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे यांनी केली आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धामणगाव बढे पोलिसांकडून शुभम घोंगटे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडताना शुभम घोंगटे म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकरी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च करून पिके उभी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. मक्याचे उत्पादन एकरी दोन ते तीन क्विंटलपर्यंत मर्यादित राहिल्याने कापणी आणि मळणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचीही अशीच अवस्था झाली आहे. रब्बी हंगामाची तयारी करावी तर विहिरींमध्येही पुरेसे पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

 

पाच हजारांच्या मदतीवर संताप

शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे घोंगटे यांनी म्हटले. एवढ्या तुटपुंज्या रकमेत शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना सन्मानजनक आर्थिक मदत देऊन त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

पोलिसांच्या नोटिशीनंतरही आंदोलनाची भूमिका कायम

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आवाज उठवण्यास तयार आहेत. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शुभम घोंगटे यांनी केला. धामणगाव बढे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

“अशा नोटिशींना मी भीक घालत नाही.

अशा नोटिशींनी आमचे कपाट भरले आहे. शेतकऱ्यांसाठी लढणे हा गुन्हा असेल, तर तो मी एकदा नव्हे, हजार वेळा करेन. मी लढत होतो, लढत आहे आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहीन,” असा ठाम निर्धार शुभम घोंगटे यांनी व्यक्त केला.

 

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या

नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी घोंगटे यांनी पुन्हा एकदा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

— शुभम घोंगटे पाटील

युवासेना उपजिल्हाप्रमुख, बुलढाणा

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!