SIR कामासाठी विमा संरक्षण, विशेष मानधन व मुदतवाढ द्या : किशोर पवार
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी

बुलढाणा
राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेमुळे बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून कार्यरत अधिकारी-कर्मचारी, विशेषतः शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने त्यांच्या सेवेसाठी विशेष मानधन, विमा संरक्षण आणि कामाच्या मुदतीत वाढ देण्याची मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांनी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, SIR हे जनगणनेप्रमाणे व्यापक, वेळखाऊ आणि अत्यंत जबाबदारीचे काम असून त्यासाठी प्रत्येक BLO ला नियमित मानधनाव्यतिरिक्त ५० हजार रुपयांचे विशेष मानधन देण्यात यावे. तसेच या मोहिमेत सहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विशेष मानधन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय SIR कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विमा संरक्षण योजना लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सध्या SIR मोहिमेसाठी देण्यात आलेली ३० दिवसांची मुदत अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाळा, अतिवृष्टी, पूरस्थिती, दुर्गम भागांतील वाहतूक अडथळे तसेच नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध न होणे, या कारणांमुळे प्रत्यक्ष पडताळणीच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मोहिमेसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती शक्यतो टाळण्याचे निर्देश असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांऐवजी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महावितरण कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक तसेच आयोगाने मान्यता दिलेल्या इतर पात्र कर्मचाऱ्यांची BLO म्हणून नियुक्ती करण्यासाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, BLO यांना सध्या मिळणारे वार्षिक १२ हजार रुपयांचे मानधन वाढवून २४ हजार रुपये करण्यात यावे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित ठेवत मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करत किशोर पवार यांनी शासन व निवडणूक आयोगाने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन केले
यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हाउपाध्यक्ष गजानन मोतेकर, बुलढाणा तालुकाध्यक्ष गजानन पडोळ, तालुका कार्याध्यक्ष जनार्दन तेजनकर, तालुका उपाध्यक्ष निलेश डुकरे, तालुका सचिव प्रशांत डहाळे, तालुका सहसचिव जनार्दन तेजनकर, सदस्य संजय खांडवे आदी उपस्थित होते.



