जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ शेतकऱ्यांना ६७ कोटी ३६ लाख रुपये जमा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार सात हजारांचा लाभ, खा. जाधव यांच्या प्रयत्नाला यश

प्रतिनिधी | बुलडाणा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांत ६७ कोटी ३६ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये व राज्य शासनाच्या माध्यमातून पाच हजार रुपये, असा एकूण सात हजार रुपयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिली.
ते, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झालेल्या निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद वाकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, हवामानातील बदल व अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात शेतीसमोर विविध आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईलद्वारे छायाचित्र अपलोड करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. या डिजिटल सुविधांचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी केले. डॉ. धनराज उंदीरवाडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांची माहिती दिली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि चारा नियोजनाचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
माती परीक्षण अहवाल मराठीत देण्यावर भर
माती परीक्षणाचे अहवाल केवळ तांत्रिक स्वरूपात न देता शेतकऱ्यांना सहज समजतील अशा सोप्या मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश (एनपीके) यांचे प्रमाण किती आहे, त्यानुसार कोणती खते वापरावीत, याची स्पष्ट माहिती अहवालातून मिळाली पाहिजे. त्यामुळे खतांचा संतुलित वापर होऊन उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
रब्बी हंगामात चारा पिकांच्या नियोजनाचे आवाहन
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा. पिण्याच्या पाण्याची गरज आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता यांचा विचार करून रब्बी हंगामाचे नियोजन करावे. हरभरा, ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे. चारा उत्पादनाला चालना देण्यासाठी शासनाकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
00




