पारंपरिक शेतीला फाटा; केळीच्या बागेतून मुन्ना पाटील यशस्वी भरारी

संग्रामपूर
पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर विचार करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीतही भरघोस यश मिळू शकते, हे तालुक्यातील कोद्री येथील प्रगतशील शेतकरी देवानंद प्रल्हाद खोंड (मुन्ना पाटील) यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दोन एकर क्षेत्रात उभारलेल्या त्यांच्या केळीच्या आदर्श फळबागेने आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी या बागेतील पहिल्या कापणीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मुन्ना पाटील यांचा शेला व टोपी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी हा गौरव केवळ एका शेतकऱ्याचा नसून, त्यांच्या कष्ट, जिद्द आणि दूरदृष्टीचा सन्मान असल्याचे नमूद केले.
सध्या शेती क्षेत्रात असलेल्या अनिश्चिततेमुळे अनेक शेतकरी पारंपरिक कपाशी आणि सोयाबीन पिकांच्या चक्रात अडकलेले असताना, मुन्ना पाटील यांनी वेगळी वाट निवडली. योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि अत्यंत देखणी व उत्पादनक्षम केळीची बाग फुलवली.
या यशस्वी प्रयोगामुळे कोद्री गावातील इतर शेतकऱ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. पारंपरिक पिकांसोबत फळबागांची जोड दिल्यास आर्थिक उन्नती साधता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. परिणामी, गावातील तरुण शेतकरीही आता फळबागांकडे वळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, या अभिनव उपक्रमाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी कु. मनीषा हांडे यांनी दिली. अशा प्रगतशील प्रयोगांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त करत मुन्ना पाटील यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




