देशभरची सायबर लूट बुलढाण्यात धुतली?; ‘म्युल खात्यां’वर पोलिसांचा एकाच वेळी घाव

आठ पोलिस ठाण्यांत दहा गुन्हे; सायबर टोळ्यांची आर्थिक रसद उघडी, ‘मनी ट्रेल’ने जिल्ह्यापर्यंत पोहोचले धागेदोरे

बुलढाणा :

देशभरातील ऑनलाइन फसवणुकीतून लुटलेला पैसा बुलढाणा जिल्ह्यातील संशयित ‘म्युल बँक खात्यां’मधून फिरवल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरील ‘मनी ट्रेल’च्या तपासातून हे आर्थिक धागेदोरे जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी समन्वित कारवाई करत आठ पोलिस ठाण्यांत तब्बल दहा गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे सायबर टोळ्यांच्या आर्थिक साखळीवर थेट प्रहार झाल्याचे मानले जात आहे.

मलकापूर, खामगाव, चिखली, सोनाळा, मेहकर आणि देऊळगाव राजा येथे प्रत्येकी एक, तर धाड आणि सिंदखेड राजा पोलिस ठाण्यांत प्रत्येकी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, संशयित खात्यांमधून देशभरातील सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारून ती पुढे वळविण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

चिखलीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका खात्याशी पंजाब, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील १५ तक्रारी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान या खात्यात ८० हजार रुपयांची संशयित रक्कम जमा झाल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.

धाड पोलिसांनी चांडोळ शाखेतील दोन खात्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले. एका खात्याशी सहा, तर दुसऱ्याशी पाच तक्रारी जोडल्या गेल्या असून, दोन्ही खात्यांतून प्रत्येकी सुमारे एक लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. सोनाळ्यातील बावनबीर शाखेच्या खात्यात बंगळुरूमधील फसवणुकीशी संबंधित ५८ हजार २५० रुपये जमा होऊन पुढे वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. देऊळगाव राजा येथील एका खात्याद्वारे देशातील किमान चार नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला असून, मेहकरमधील संशयित खातेदार लोणार येथील असल्याची माहितीही समोर आली आहे.

 

 

–म्युल खाते म्हणजे काय?–

सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारणे, काढणे किंवा दुसऱ्या खात्यात वळविण्यासाठी वापरले जाणारे खाते म्हणजे ‘म्युल खाते’. कमिशनच्या मोबदल्यात खाते उपलब्ध करून दिले जाते किंवा काही वेळा खातेधारकाची दिशाभूल करून त्याचा वापर केला जातो.

 

 

–खाते दिले, तर अडचण ठरू शकते–

कमिशन, नोकरी, कर्ज किंवा इतर आमिषांना बळी पडून बँक खाते, एटीएम कार्ड, धनादेश पुस्तिका, यूपीआय, ओटीपी किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती इतरांना देणे धोकादायक ठरू शकते. अशा खात्यात फसवणुकीची रक्कम आढळल्यास खाते गोठविणे, चौकशी आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

 

 

‘–मनी ट्रेल’ने उलगडते संपूर्ण जाळे–

सायबर गुन्ह्यातील रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली, त्यानंतर ती कोणकोणत्या खात्यांतून फिरली आणि अखेरीस कोणी काढली, या संपूर्ण आर्थिक प्रवासाला ‘मनी ट्रेल’ म्हणतात. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) प्रणालीद्वारे विविध राज्यांतील तक्रारी, बँक व्यवहार आणि संशयित खात्यांची सांगड घालून या आर्थिक साखळीचा माग काढला जातो.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!