विशालकुमार मोरे यांना राज्यस्तरीय पहिला ‘भीमशाहिर पुरस्कार’
लोककवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त येहळेगाव सोळंके येथे पुरस्कार सोहळा

बुलढाणा
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव सोळंके (ता. औंढा नागनाथ) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भीमशाहिर सन्मान व पुरस्कार सोहळ्यातील पहिला मानाचा ‘भीमशाहिर पुरस्कार’ बुलढाण्याचे सुपुत्र, राष्ट्रीय युवा प्रबोधनकार तथा शाहिर विशालकुमार मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. पुरस्कार वितरण सोहळा ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता येहळेगाव सोळंके येथे ज्येष्ठ कवी-गायक कै. प्रतापसिंग बोदडे नगरीत आयोजित करण्यात आला आहे.
खान्देशातील सुप्रसिद्ध आंबेडकरी कवी सारंग पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विशालकुमार मोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन करण्याबरोबरच शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेणाऱ्या कलावंतांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरणानंतर विशालकुमार मोरे यांच्या क्रांतिकारी व प्रबोधनपर गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शाहिरी, गीत आणि विचारांच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाचीही उपस्थितांमध्ये उत्सुकता आहे.
लोककला, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांचा जागर करणाऱ्या या सोहळ्यास कला रसिक तसेच आंबेडकरी विचारांचे अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




