सहा टिप्परसह १ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त; डॉ. केशव अवचार यांच्यासह वाहनमालक-चालकांवर गुन्हे

अवैध रेती वाहतुकीवर लोणार प्रशासनाचा दणका

लोणार

लोणार तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. खापरखेड लाड शिवारात केलेल्या कारवाईत विनापरवाना रेती वाहतूक करणारे तब्बल सहा टिप्पर पकडण्यात आले. या वाहनांमध्ये असलेल्या रेतीसह सर्व वाहनांची एकत्रित किंमत तब्बल १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रकरणी रेती ठेकेदार डॉ. केशव अवचार यांच्यासह संबंधित वाहनमालक व चालकांविरुद्ध ९  सप्टेबर रोजी बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ सप्टेंबर रोजी सकाळी लोणारचे उपविभागीय अधिकारी सानप, तहसीलदार पाटील, नायब तहसीलदार इप्पर, मंडळ अधिकारी सानप यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव व महसूल पथक खापरखेड लाड येथील लिलाव झालेल्या रेतीघाटावरील स्टॉकची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सकाळी सुमारे ११.५५ वाजता रेतीघाट परिसरात संशयास्पदरीत्या सहा टिप्पर आढळून आले.  महसूल अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष वाहनांची तपासणी केली असता प्रत्येक टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळली. मात्र, संबंधितांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी अथवा अन्य वैध परवानगीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे सहाही वाहने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली.  यात  वाहन क्रमांक एमएच २८ बीबी २१३० या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती असून वाहनमालक दिलीप वायाळ व चालक सोनू सुभाष आडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एमएच २८ बीबी ६०४२एमएच २८ बीए ६०४२ ही दोन वाहने रवि बाबुराव जाधव यांच्या मालकीची आहेत. एमएच २८ बीएक्स ७०९० हे वाहन इम्रान शेख यांच्या मालकीचे, तर एमएच २८ सीएफ ०१७९ हे वाहन अरुण लाड यांच्या मालकीचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. एमएच २८ बीबी ९९२५ या टिप्परचे मालक डॉ. केशव अवचार असून त्यावर चालक म्हणून पंकज भुजंग भालेराव यांचे नाव नमूद आहे. प्रत्येक टिप्परमध्ये आढळलेल्या सहा ब्रास रेतीची किंमत सुमारे ३६ हजार रुपये असून वाहनांच्या किमतीसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपये इतकी आहे.

चौकशीदरम्यान संबंधितांकडून ही रेती ‘देवी जुळजाइ प्रा. लिमिटेड’ यांच्या स्टॉकमधून भरून आणल्याची माहिती महसूल पथकाला मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र, रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे सादर करता न आल्याने प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली.

या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव यांच्या फिर्यादीवरून बीबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रेणुका दामोदर पदघन करीत आहेत.

महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!