राजुरा प्रकरण : कवटीचा ‘डिजिटल चेहरा’ तयार होणार

वैज्ञानिक पुनर्रचनेच्या आधारे गूढ उलगडण्याचा प्रयत्न

  • बुलढाणा :

राजुरा शिवारात सापडलेल्या शिरविरहित आणि अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाने निर्माण केलेले रहस्य अद्याप कायम असून, आता या गूढाचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणांनी अत्याधुनिक फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची तयारी सुरू केली आहे. शिवानी काळमेकर जिवंत सापडल्यानंतर तपासाची संपूर्ण दिशा बदलली असून, राजुरा येथील मृत महिला नेमकी कोण होती, हा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अज्ञात महिलेची कवटी ताब्यात घेतली असून तिच्या आधारे चेहऱ्याची वैज्ञानिक पुनर्रचना (Facial Reconstruction) करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. ३ जून रोजी जळगाव जामोद येथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहातील कवटी अधिकृत प्रक्रियेनंतर ताब्यात घेण्यात आली.

फॉरेन्सिक शास्त्रातील या पद्धतीमध्ये कवटीची रचना, हाडांचा आकार, डोळ्यांच्या खोबणी, नाकाचा पाया, जबड्याची ठेवण आणि इतर जैविक वैशिष्ट्यांचे सूक्ष्म विश्लेषण केले जाते. या माहितीच्या आधारे संगणकीय प्रणालीद्वारे मृत व्यक्तीचा संभाव्य चेहरा तयार केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सॉफ्टवेअरचाही वापर केला जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तयार होणारा चेहरा बेपत्ता महिलांच्या नोंदी, उपलब्ध छायाचित्रे आणि विविध डिजिटल डेटाबेसशी जुळवून पाहता येणार आहे. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटविण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एसडीपीओ संतोष खाडे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. प्रारंभीच्या तपासातील कथित त्रुटींमुळे काही पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असून, विभागीय चौकशीचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.
शिवानी जिवंत परतली, ऑनर किलिंगचा संशय मागे पडला, अटक करण्यात आलेले संशयितही मुक्त झाले; मात्र राजुरा शिवारातील त्या अज्ञात महिलेची ओळख आजही अंधारातच आहे. त्यामुळे कवटीच्या आधारे तयार होणारा डिजिटल चेहरा या रहस्याची पहिली महत्त्वाची किल्ली ठरतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!