बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिव्हलचा जल्लोषात शुभारंभ; डॉ. सुकेश झंवर यांची लाडूतुला
‘निर्मळ मनाचा झरा म्हणजे डॉ. झंवर’; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून गौरव

बुलडाणा
पारंपरिक वेशभूषा, गरब्याच्या तालावर थिरकणारी पावले आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह अशा मंगलमय वातावरणात बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिव्हल २०२६ चा शुभारंभ रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी जिजामाता प्रेक्षागार येथे झाला. याच सोहळ्यात बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लाडूतुला करण्यात आली. या उपक्रमाला नागरिक, हितचिंतक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी डॉ. सुकेश झंवर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना निर्मळ मनाचा, प्रामाणिक आणि समाजसेवेची तळमळ असलेला माणूस असे संबोधले. ‘भाईजी’ यांनी उभे केलेले सामाजिक आणि आर्थिक विश्व डॉ. झंवर समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगत, त्यांच्या नेतृत्वात बुलडाणा अर्बन प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कोमलताई झंवर यांच्या हस्ते कन्यापूजन करण्यात आले. त्यानंतर दुर्गामातेचे पूजन व आरती करून गरबा फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. अशोकराव खरात, राजेश देशलहरा, शेवाळे मामा, अतुल लाहोटी, शेखर श्रीवास्तव, जितेंद्र कोठारी, मनीष श्रीवास्तव, मंजुताई भुतडा, पंजाबराव हिरे, सोनारे मामा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचलन रणजित राजपूत यांनी केले. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, बुलडाणा अर्बनचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
दुष्काळ निवारणासाठी मदतीचा संकल्प
गरबा फेस्टिव्हलदरम्यान दानपेटीत जमा होणाऱ्या मदतीइतकीच रक्कम स्वतःकडून भर घालून दुष्काळ निवारणासाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा डॉ. सुकेश झंवर यांनी केली. मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या लाडूतुलेतील लाडू दिव्य सेवा प्रकल्प येथे वितरित करण्यासाठी नीलेश भुतडा आणि त्यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेतला.
गरब्याच्या तालावर रंगली पहिल्या दिवसाची संध्याकाळ
१९ वर्षांची परंपरा कायम; १९ ऑक्टोबरपर्यंत रंगणार उत्सव
भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच शहरी व ग्रामीण भागातील बालकलाकार, युवक-युवती आणि महिलांना आपली गरबा-दांडिया कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने बीसीसीएन बुलडाणा अर्बन परिवार आणि सिटी न्यूज यांच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून गरबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदाचा उत्सव ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बालगोपालांपासून युवक-युवतींपर्यंत सर्वांनीच गरब्याच्या तालावर दोन ते अडीच तास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘अंबा माता की जय’च्या जयघोषाने परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला. लहान आणि मोठ्या अशा दोन गटांत गरबा स्पर्धा घेण्यात येत असून, उत्कृष्ट सादरीकरणासह आकर्षक वेशभूषा आणि विविध विशेष श्रेणींसाठीही पारितोषिके देण्यात आली.
पहिल्या दिवशी लहान गटातील पाच आणि मोठ्या गटातील दहा उत्कृष्ट स्पर्धकांसह बेस्ट कॉस्च्युम, प्रिन्स ऑफ द डे, सरगम टीम आणि ऑडियन्स पोल अशा श्रेणींमध्येही गौरव करण्यात आला. हॉटेल खान्देशी यांच्या वतीनेही पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून कीर्ती माहेश्वरी, गजानन रिंढे आणि सुनयना अंभोरे यांनी काम पाहिले. बुलडाणा अर्बनच्या कार्यकारिणी सदस्यांसह कर्मचारीवर्गाने आयोजनासाठी परिश्रम घेतले.




