कमळजा माता मंदिर खुले करण्यासाठी मापारींसह पाच जणांचे आमरण उपोषण सुरू

लोणार तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा पहिला दिवस; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

लोणार

ऐतिहासिक लोणार सरोवरातील प्रसिद्ध कमळजा माता मंदिर नवरात्रोत्सवात भाविकांच्या दर्शनासाठी खुले करावे, या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश श्रीराम मापारी यांच्यासह पाच जणांनी १२ ऑक्टोबरपासून लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा आज पहिला दिवस असून, मंदिर दर्शनाचा मार्ग खुला करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

लोणार सरोवर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कमळजा माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. नवरात्रोत्सवात राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद असल्याने भाविकांच्या दर्शनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करण्याच्या दृष्टीने सरोवरातील पाण्याचा प्रश्न सोडवून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित विभागांना यापूर्वी निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप राजेश मापारी यांनी केला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास महसूल विभाग, वन्यजीव विभाग आणि पुरातत्त्व विभाग जबाबदार राहतील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

या आमरण उपोषणात राजेश श्रीराम मापारी यांच्यासह माजी नगरसेवक साहेबराव दशरथ पाटोळे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुरेश समाधान वाठोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मधुकर मोरे आणि गोपी आखाडे सहभागी झाले आहेत.

कमळजा माता मंदिर दर्शनासाठी खुले करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून, आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!