पैनगंगा साखर कारखाना गाळप हंगामासाठी सज्ज; ३.११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
मिल रोलर पूजनाने २०२६-२७ हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात; शेतकरी हितासह रोजगारनिर्मितीवर भर

बुलडाणा
शेतकरी हित, औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या पैनगंगा साखर कारखान्याच्या आगामी २०२६-२७ गाळप हंगामाच्या पूर्वतयारीला बुधवार २६ ऑगस्ट रोजी मिल रोलर पूजनाने सुरुवात करण्यात आली. बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते विधिवत मिल रोलर पूजन करण्यात आले.
यंदाच्या हंगामात कारखान्याने ३ लाख ११ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी कारखान्याची यंत्रसामग्री, मिल, बॉयलर आणि उत्पादन विभागाची तयारी पूर्ण करण्यात आली असून, शेतकी विभागाकडून ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी गाळप हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कारखाना सज्ज झाला आहे. दरम्यान यावेळी मिल रोलर पूजनानंतर मार्गदर्शन करताना राधेश्याम चांडक यांनी पैनगंगा साखर कारखाना हा बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या हिताशी जोडलेला उद्योग असल्याचे नमूद केले. कारखान्याच्या पाठीशी बुलडाणा अर्बन भक्कमपणे उभी आहे, असे सांगत त्यांनी कारखान्याच्या भविष्यातील प्रगतीसाठीही संस्थेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली. २०२१ पासून सुरू झालेल्या कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे सांगून चांडक यांनी चेअरमन अनिल गुंजाळ यांनी बुलडाणा जिल्ह्यात वास्तव्यास राहून पेनगंगा कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणखी गती द्यावी, असे आवाहन केले.
चेअरमन अनिल गुंजाळ यांनी कारखान्याच्या आगामी वाटचालीत शेतकरी, उद्योग आणि रोजगार हे तीन प्रमुख केंद्रबिंदू राहतील, असे स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या केंद्रस्थानी असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कडू काळे, कमलेश संचेती, अजिनाथ हजारे, शेषराव जायभये, डॉ. शिवकुमार गोरे, अजिनाथ शिंदे, व्यंकटेश देशमुख, प्रजापती तसेच पूजा गुंजाळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
तोडणी-वाहतुकीचे नियोजन पूर्ण
आगामी हंगामासाठी कारखान्याच्या तांत्रिक विभागाची तयारी पूर्ण झाली असून ऊस उपलब्धतेनुसार तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. ३.११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस उपलब्धता, वाहतूक व्यवस्था आणि कारखान्याची तांत्रिक क्षमता यांचा समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे हंगामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पूर्वतयारीवर भर देण्यात आला आहे.
कामावर प्रेम करा, संस्थेशी निष्ठा जपा
कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते जयंत आर्टे यांचे ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले. दैनंदिन कामाकडे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता त्यात आनंद आणि समाधान शोधावे, कामावर प्रेम करावे आणि संस्थेशी निष्ठा जपावी, असा संदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. ज्या संस्थेत आपण कार्यरत आहोत, त्या संस्थेमुळे समाजात ओळख आणि सन्मान मिळतो. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीत आपला वाटा देताना कामातून आत्मसन्मान आणि समाधान मिळविण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे आवाहन आर्टे यांनी केले.



