विद्यार्थिनींनी पोलिस बांधवांना बांधली राखी; रक्षाबंधनातून जपला स्नेहबंध
लक्ष्मीबाई विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींचा धामणगाव बढे पोलीस ठाण्यात अनोखा उपक्रम

सादिक बिस्मिल्लाह शेख | धामणगाव बढे
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लक्ष्मीबाई विद्या मंदिर, धामणगाव बढे येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट देत पोलिस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्याप्रती असलेला स्नेह व आदर व्यक्त केला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी पोलिसांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कर्तव्याची माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना अनेकदा सण-उत्सवाच्या दिवशीही कर्तव्य बजावावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी व्यक्त केलेली आपुलकी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरली. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे पोलिस बांधवांनीही कौतुक केले. विद्यार्थिनींचा उत्साह वाढविण्यासाठी पोलिसांकडून त्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले. या छोटेखानी उपक्रमातून विद्यार्थी आणि पोलिस यांच्यातील स्नेह, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. यावेळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच लक्ष्मीबाई विद्या मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य जाधव, चालक कर्मचारी समाधान काळे, सचिन वाघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये समाजाप्रती कृतज्ञता, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली. पोलिसांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताबद्दल आणि शालेय साहित्य भेट दिल्याबद्दल लक्ष्मीबाई विद्या मंदिर परिवाराने ठाणेदार निखिल निर्मळ यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.



