मंठा चौफुलीवरील डिव्हायडर ठरतोय ‘डेथ ट्रॅप’!

रात्रीच्या अंधारात वाहनचालकांची कसरत; चेतावणी फलक, रिफ्लेक्टर आणि पथदिव्यांचा अभाव

लोणार

 लोणार शहरातील वर्दळीच्या मंठा चौफुलीवरील रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेला डिव्हायडर सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने डिव्हायडर अक्षरशः ‘डेथ ट्रॅप’ बनल्याची परिस्थिती आहे.

मंठा चौफुलीवरून रात्रीच्या वेळी जड वाहने, चारचाकी तसेच दुचाकींची मोठी वर्दळ असते. मात्र, डिव्हायडरवर वाहनांच्या प्रकाशात सहज दिसतील असे रेडियम रिफ्लेक्टर अथवा चमकणारे चेतावणी चिन्ह लावण्यात आलेले नाही. त्याचबरोबर ‘पुढे डिव्हायडर आहे, वेग कमी करा’ अशा आशयाचा ठळक दिशादर्शक किंवा सावधानतेचा फलकही नसल्याने वाहनचालकांना अंधारात डिव्हायडरचा अंदाज येत नाही.

अचानक समोर आलेल्या डिव्हायडरमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत असून, दुचाकी घसरणे, डिव्हायडरला धडकणे किंवा वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे चौफुली परिसरातील बंद पथदिव्यांमुळे समस्येत आणखी भर पडली आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्याची स्थिती स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे.

अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का?

एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन डिव्हायडरवर रेडियम रिफ्लेक्टर बसवावेत, ठळक चेतावणी फलक लावावेत तसेच बंद पथदिवे तत्काळ सुरू करून पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना वेळेत न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘अपघाताची वाट पाहण्याऐवजी’ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!