बुलडाण्याच्या तोंडाला पुन्हा पुसली पाने; मडगाव एक्सप्रेसला केवळ शेगाव येथेच थांबा

उन्हाळ्यात नागपूर ते मडगाव मार्गावर विशेष द्विसाप्ताहिक सेवा

प्रतिनिधी | बुलडाणा
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे ने नागपूर ते मडगाव दरम्यान विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला तरी बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने मात्र पुन्हा एकदा निराशा पदरी पडली आहे. या विशेष गाडीला जिल्ह्यातील केवळ शेगाव येथेच थांबा देण्यात आला असून इतर महत्त्वाच्या स्थानकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रवाशांना या सेवेचा थेट लाभ मिळणार नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

उन्हाळयात दरवर्षी नागपूर ते मडगाव जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढते. याबाबत निर्णय घेत मध्य रेल्वेने नागपूरहून मडगावसाठी द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे उन्हाळ्यातील तिकिटांची वाढती मागणी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः कुटुंबांसह सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. या गाडीच्या एकूण ५३ फेऱ्या होतील. १५ एप्रिल ते १५ जुलै २०२६ दरम्यान ही गाडी आठवड्यातून दोनदा धावणार आहे. परतीच्या प्रवासासाठीही नियमित व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर ते मडगाव या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेला वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रत्नागिरी व सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या विशेष रेल्वेला बुलडाणा जिल्ह्यासाठी अधिक थांबे देण्याची मागणी यापूर्वीही वारंवार करण्यात आली असली तरी ती अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे या निर्णयामुळे पुन्हा एकदा बुलडाण्याच्या तोंडाला पाने पुसली अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नांदुरा, मलकापूरला थांबणार नाही मडगाव एक्सप्रेस
जिल्ह्यातील मलकापूर, शेगाव व नांदुरा ही तिन्ही रेल्वे स्थानके प्रवासी दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या तिन्ही ठिकाणांहून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत असून, स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या स्थानकांवर मोठी वर्दळ असते. विशेषतः शेगाव हे धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र असल्याने येथे देशभरातून भाविकांची मोठी गर्दी असते. तर मलकापूर आणि नांदुरा ही व्यापारी व शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाची केंद्रे असल्याने या भागातील नागरिक रेल्वेसेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना या सर्व स्थानकांवर समान थांबे न दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सीएसएमटी–नागपूर मार्गावर ५२ विशेष फेऱ्या
उन्हाळ्यातील वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान ५२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई–विदर्भ मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार असून, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना या सेवांचा मोठा फायदा होणार आहे. तर पुणे-नागपूर- हडपसर साप्ताहिक आणि पूर्ण वातानुकूलित विशेष गाड्याही जाहीर करण्यात आली आहे.

000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!