लोणार नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या!
नगरसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत मापारी यांची उपमुख्यमंत्रीांकडे मागणी

लोणार
लोणार नगरपरिषदेला नियमित व पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजासह शहरातील विविध विकासकामांच्या नियोजन व अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत नागसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी यांनी नगरपरिषदेस तातडीने कायमस्वरूपी व पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे.
लोणार शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. लोणार सरोवरामुळे शहराची देश-विदेशात ओळख आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा आणि पर्यटकांसाठीच्या मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. नगरपरिषद क्षेत्रात सध्या विविध विकासकामे सुरू असून, या कामांचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता आहे. निधीचा नियमानुसार विनियोग, कामांचा नियमित आढावा, प्रशासकीय व तांत्रिक समन्वय तसेच शासनाच्या विविध विभागांशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी मुख्याधिकारी पदावर पूर्णवेळ अधिकारी असणे गरजेचे असल्याचे मापारी यांनी निवेदनात नमूद केले आहे. सध्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांसोबत लोणार नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजासह विकास प्रकल्पांवर सातत्याने लक्ष ठेवताना प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम विकासकामांच्या गतीवर होऊ नये, यासाठी स्वतंत्र पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोणारचा पर्यटनदृष्ट्या नियोजित व शाश्वत विकास करण्यासाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा आवश्यक आहे. शहरातील विकासकामांना गती देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेला तातडीने नियमित, पूर्णवेळ व स्वतंत्र मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी मापारी यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त अमरावती तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनाही सादर करण्यात आले आहे.




