पावसाने उघड केली रस्ते कामाची गुणवत्ता; अनियंत्रित होत असल्याने वाहनांचा अपघात

 

धामणगावबढे

वाघजळ फाटा ते धामणगाव बढे या मार्गावरील एका बाजूच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या (शोल्डर) खचल्यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला मुरूम दबला असून, त्यामुळे सिमेंट रस्ता आणि साईड पट्टीमध्ये दोन ते तीन इंचांची खोल खाच निर्माण झाली आहे. परिणामी मंगळवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तब्बल ८ ते १० दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

या मार्गावर एका बाजूचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी पुलाच्या कामामुळे रस्ता अद्याप अपूर्ण आहे. नियमानुसार सिमेंट रस्त्याच्या कडेला मुरूम टाकून रोलरद्वारे दाबून साईड पट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा मुरूम खाली बसला असून अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या पातळीपेक्षा दोन ते तीन इंच खोल खाच तयार झाली आहे.

 

यामुळे एखादे दुचाकी वाहन चुकून साईडला उतरल्यास किंवा पुन्हा मुख्य सिमेंट रस्त्यावर चढवताना चाक सिमेंटच्या तीक्ष्ण कडेला आदळते आणि वाहनचालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरते. परिणामी अपघातांची मालिका सुरू झाली असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

विशेष म्हणजे, भिकन खाटीक ते सद्दाम खाटीक यांच्या घरासमोरील परिसरात मंगळवारी सर्वाधिक अपघात घडले. दिवसभरात या ठिकाणी ८ ते १० दुचाकीस्वार घसरून पडल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या आहेत.

 

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पावसामुळे साईड पट्ट्या खचल्या असतानाही त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोज अपघात होत असून वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने दर्जेदार मुरूम टाकून रोलरद्वारे योग्य प्रकारे दाबाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन रस्त्यालगतच्या खचलेल्या साईड पट्ट्यांची दुरुस्ती करावी, जेणेकरून पुढील अपघात टाळता येतील, अशी मागणी वाहनधारक आणि ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!