पंचातय समिती मध्ये बायोमेट्रिक शिवाय होणार नाही वेतन

नव्या आदेशाने कर्मचाऱ्यात खळबळ : बायोमेट्रिक कार्यान्वित

 

लोणार | प्रतिनिधी
पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन मिळणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असून नव्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कार्यालयीन शिस्त वाढविणे आणि उपस्थितीची अचूक नोंद ठेवणे या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोणार पंचायत समितीमध्ये कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना साध्या कामांसाठी तासनतास वाट पाहावी लागत होती, तर काही कर्मचारी हजेरी लावून गायब होत असल्याचे चित्र होते. या ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ वृत्तीवर प्रकाश टाकला होता. यावर लोणारचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने हालचाली केल्या. आता रखडलेले बायोमेट्रिक मशीन बसवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.
या निर्णयानुसार, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दररोज बायोमेट्रिक मशीनवर उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. बायोमेट्रिक नोंद नसल्यास त्या दिवसाची उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही आणि त्याचा थेट परिणाम वेतनावर होणार आहे. त्यामुळे वेळेत उपस्थित राहणे व कार्यालयीन शिस्त पाळणे आवश्यक झाले आहे. या निर्णयामागे कामकाजात पारदर्शकता आणणे, गैरहजेरीवर नियंत्रण ठेवणे आणि सरकारी कामकाजाची गती वाढविणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी काही ठिकाणी हजेरीबाबत तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, अचानक लागू झालेल्या या नियमामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून तांत्रिक अडचणींचा मुद्दाही पुढे येत आहे. मात्र, प्रशासनाने बायोमेट्रिक प्रणाली सुरळीत चालण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

नियमाचे पालन न करणाऱ्यावर कारवाई
“बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमुळे पारदर्शकता येईल. जे कर्मचारी वेळेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल,” असा इशारा

डा. उमेश देशमुख, गट विकास अधिकारी लोणार.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!