लोणार महोत्सव १० वर्षापासून कागदावरच; घोषणा विरली हवेत!

 

गोपाल तोष्णीवाल |  लोणार

जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवर च्या पर्यटन विकासासाठी प्रशासनाकडून ‘योग महोत्सव’ आणि ‘खगोल महोत्सव’ यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असला, तरी लोणारच्या मूळ ओळखीचा ‘लोणार महोत्सव’ अद्यापही प्रत्यक्षात साकारलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “बुंद से गयी वह हौद से नहीं आती” या म्हणीप्रमाणे मूळ संकल्पनेपासून दूर जाण्याचा धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

लोणार सरोवराचे महत्त्व केवळ योगाभ्यास किंवा खगोल निरीक्षणापुरते मर्यादित नाही. येथे असलेली प्राचीन मंदिरे, समृद्ध जैवविविधता, ऐतिहासिक वारसा आणि स्थानिक कला या सर्व घटकांचा समावेश असलेली व्यापक ओळख आहे. ‘लोणार महोत्सव’ ही संकल्पना याच सर्वांगीण वैशिष्ट्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात छोटे-मोठे स्वतंत्र कार्यक्रम राबवून त्या मूळ संकल्पनेची पूर्तता होत नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. योग आणि खगोल महोत्सव हे मर्यादित स्वरूपाचे असून ते विशिष्ट घटकांपुरतेच केंद्रित राहतात. याउलट लोणार महोत्सवामुळे संपूर्ण शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा होती. तसेच, महोत्सवाच्या माध्यमातून सरोवर संवर्धन, पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाच्या पर्यटन सोयीसुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, या बाबतीत अद्याप ठोस प्रगती झालेली दिसून येत नाही.

    दरम्यान, लोणार महोत्सवाच्या घोषणा वारंवार केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष आयोजन होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. छोटे कार्यक्रम घेऊन वेळ मारून नेला जात असल्याची भावना अधिक तीव्र होत आहे. “योग आणि खगोल महोत्सवांचे आम्ही स्वागत करतो; मात्र लोणारची खरी ओळख असलेल्या ‘लोणार महोत्सवा’ची जागा हे कार्यक्रम घेऊ शकत नाहीत. मूळ महोत्सवाकडे दुर्लक्ष करून केवळ इव्हेंट मॅनेजमेंटवर भर दिला जात आहे,” अशी प्रतिक्रिया येथील पर्यटनप्रेमींनी व्यक्त केली आहे.

यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, प्रशासन केवळ वेगवेगळ्या कार्यक्रमांपुरते मर्यादित राहणार की लोणारचा खरा गौरव असलेला ‘लोणार महोत्सव’ प्रत्यक्षात राबवून या जागतिक वारशाला न्याय देणार?

 

“जनतेचा सवाल: लोकप्रतिनिधी गप्प का?”

लोणार महोत्सवाच्या मुद्द्यावरून प्रशासकीय पातळीवर हालचाली मंदावल्या असतानाच, स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जागतिक वारसा असलेल्या या स्थळाच्या मुख्य महोत्सवासाठी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत किंवा शासनाकडे पाठपुरावा का केला नाही? केवळ ‘योग’ आणि ‘खगोल’ सारख्या इव्हेंट कार्यक्रम घेऊन लोणारचा प्रश्न सुटणार का? प्रशासनाच्या या ‘तुकड्या-तुकड्यात’ होणाऱ्या महोत्सवांच्या भूमिकेला लोकप्रतिनिधींचे मूक संमती आहे की तेही हतबल आहेत, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!