मुख्य सब-स्टेशन सुरू, मग बिल भरणारे ग्राहक अंधारात का? नागरिकांचा सवाल

 

लोणार

मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होताच लोणार शहर आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरू झाले आहे. पावसाचा पहिला शिडकावा आणि वादळी वारे सुरू होताच महावितरणची वीज गुल होत असल्याने नागरिकांना भर उकाड्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विजेचा बोजवारा उडाल्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे.दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणकडून झाडांच्या फांद्या छाटणे, वीज वाहक तारा दुरुस्त करणे आणि इन्सुलेटर बदलणे यांसारखी कामे कागदावर दाखवली जातात. मात्र, प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होताच अवघ्या काही मिनिटांत वीज गायब होते. पाऊस थांबल्यानंतरही तासनतास वीज पुरवठा पूर्ववत होत नसल्याने नागरिकांसह व्यावसायिक आणि पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.

सब-स्टेशन सुरू, मग शहरात अंधार का?

सर्वात संतापजनक बाब म्हणजे मुसळधार पाऊस सुरू असतानाही महावितरणचे मुख्य ‘सब-स्टेशन’ (विद्युत उपकेंद्र) मात्र सुरळीत सुरू असते. मुख्य केंद्रातून वीज पुरवठा उपलब्ध असतानाही, शहरातील स्थानिक वाहिन्यांवरील (फीडर) तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात महावितरण अपयशी ठरत आहे. प्रामाणिकपणे दरमहा विजेचे बिल भरणारे शहरातील ग्राहक मात्र अंधारात चाचपडत आहेत. “आम्ही नियमित बिल भरूनही आम्हाला ही वागणूक का?” असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. सब-स्टेशन सुरू असूनही शहराला अंधारात ठेवणाऱ्या महावितरणच्या या नियोजनशून्य कारभारावर आता तीव्र टीका होत आहे.

 

अंधाराचे साम्राज्य अन् आरोग्याचा धोका

रात्रीच्या वेळी दीर्घकाळ वीज खंडित राहत असल्याने नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरात डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, विजेच्या सततच्या लपंडावामुळे घरातील महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळण्याचे प्रमाणही वाढले आहे.

पर्यटन आणि शेती व्यवसायाला फटका

लोणार हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असूनही येथे वीज पुरवठ्याची ही दुरवस्था आहे. ग्रामीण भागात तर पेरणीचे दिवस असतानाच वीज गायब होत असल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. महावितरणने आपले तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करून अखंडित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदूभाऊ मापारी यांनी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!