लोणारात दिवसभराच्या मोहिमेत फक्त एकच वाहन जप्त; अवैध रेती वाहतुकीची कारवाई की दिखावा
तहसील प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांना अर्थपुर्ण शंका

गोपाल तोष्णीवाल | लोणार
: तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली. तहसीलदार भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य मार्गांवर नाकाबंदी करून रेती वाहतुकीची तपासणी करण्यात आली. मात्र दिवसभर चाललेल्या या कारवाईत केवळ एका वाहनावरच दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकात अर्थपुर्ण प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात अवैध रेती उत्ख नन आणि वाहतुकीच्या तक्रारी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महसूल विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. सकाळपासून महसूल कर्मचाऱ्यांसह पथक विविध मार्गांवर तैनात करण्यात आले. प्रशासनाच्या या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र दिवसअखेर प्रशासनाच्या हाती केवळ एकच वाहन लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात रेतीने भरलेली वाहने ये-जा करतात. अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेत असल्याचेही वारंवार निदर्शनास येत असते. अशा परिस्थितीत दिवसभराच्या मोहिमेत फक्त एकाच वाहनावर कारवाई होणे संशय निर्माण करणारे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ही मोहीम केवळ औपचारिकता ठरल्याची टीका केली.
केवळ दाखवण्यासाठी कारवाई?
या मार्गावर दिवस रात्र रेतीची तस्करी होत आहे. अशा परिस्थितीत तहसील प्रशासनाच्यावतीने दिवभरातून केवळ एकाच वाहनावर कार्यवाही होत आहे. हे केवळ नागरिकांना दाखवण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न नागरिकात उपस्थित केला जात असून, या प्रक्रिये मागे अर्थपुर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकात आहे.




