बुलढाण्याचे “जिजाऊ नगर” नामकरण होणार
आ. संजय गायकवाड यांची अधिवेशनात मागणी

प्रतिनिधी | बुलडाणा,
प्रतिनिधी | बुलढाणा :
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला असून हा परिसर त्यांचे माहेर म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घडणीत जिजामाता यांचे अनन्यसाधारण योगदान असल्याने या भूमीला ऐतिहासिक व जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण “जिजाऊ नगर” असे करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. गायकवाड यांनी विविध प्रश्नांवर आक्रमक व ठोस भूमिका मांडत शासनाचे लक्ष वेधले. जलसंपदा, कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, सामाजिक प्रश्न तसेच ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत त्यांनी सविस्तर मांडणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी असलेल्या करवंड (ता. चिखली) येथील ऐतिहासिक वास्तूंचा विकास करण्याची मागणी केली. तसेच बुलढाणा शहरातील व्यापारी व व्यावसायिकांना चालना मिळावी यासाठी दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नवीन मंडळांना पोलीस परवानगी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून नियम सुलभ करण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत त्यांनी कठोर कारवाई व ठोस धोरणाची गरज अधोरेखित केली.
दरम्यान, “जिजाऊ नगर” नामकरणाची मागणी ही जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनेशी निगडित असल्याने या विषयावर त्यांनी विशेष जोर दिला आहे. यानुसार शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत असून, लवकरच बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाबाबत निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत.




