खामगाव वन्यजीव परिक्षेत्रात ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर
वृक्षारोपणासह स्वच्छता अभियान; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

खामगाव,
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा अभयारण्यांतर्गत खामगाव वन्यजीव परिक्षेत्राच्या वतीने ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. सदर कार्यक्रम ५ जून रोजी वन परिक्षेत्र कार्यालय, खामगाव तसेच बोथा येथील निसर्ग परिचय केंद्र परिसरात हा उपक्रम उत्साहात पार पडला.
पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ व्हावी या उद्देशाने विविध स्थानिक वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. त्याचबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेत वृक्षलागवडीसोबतच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यशवंत नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) चेतन राठोड आणि वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) दिपेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात वन विभागातील अधिकारी-कर्मचारी, वनमजूर, वाहनचालक, बोथा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपक्रमादरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




